Sunday 2 September 2018

चिमणी पक्ष्याचे घरटे व्हिडीओ





हा पक्षी हिमालयाच्या २००० मी. उंचीपर्यंत, तसेच भारतभर सर्वत्र आढळतो तसेच बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमारसह इतरही देशात आढळतो. भारतात काश्मिरी आणि उत्तर-पश्चिमी अशा याच्या किमान दोन उपजातीही आढळतात.

माणसाच्या अगदी जवळच राहणारा हा पक्षी असून कीटक, धान्य, मध, शिजवलेले अन्न असे सर्व प्रकारचे खाद्य खातो. विणीचा हंगाम वर्षभर असू शकणारा पक्षी अशी ओळखही या पक्ष्याची आहे. गवत, कापूस, पिसे, मिळतील त्या वस्तू वापरून घराचे छत, वळचणीच्या जागा, दिव्यांच्या मागे, झाडांवर असे कुठेही घरटे बांधतो. मादी फिकट हिरव्या पांढर्‍या रंगाची, त्यावर तपकिरी ठिपके असलेली ४ ते ५ अंडी देते. अंड्यांच्या रंगात स्थानिक बदलही आहेत. नर-मादी घरटे बांधण्यापासून, अंडी उबविणे, पिलांना खाऊ घालणे वगैरे सर्व कामे मिळून करतात. *चिमण्यांचे आयुष्य सहा महिने ते तीन वर्षांपर्यंत असते*. ज्ञात असलेली सर्वात वयस्कर वन्य चिमणी जवळपास दोन दशके जगली. त्याचबरोबर नोंद असलेली सर्वात वयस्कर कैदेतील चिमणी २३ वर्षे जगली.

चिमण्यांच्या बाबतीत अशी एक वदंता आहे की, एखाद्या चिमणीला माणसाने पकडले आणि परत सोडले, तर बाकीच्या चिमण्या त्या चिमणीला त्यांच्यामधे घेत नाहीत व चोचीने मारतात किंवा तिला बहिष्कृत करतात; प्रसंगी,जीव देखील घेतात.

अलीकडे वाढत्या शहरीकरणामुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. विषेशत: शहरांमध्ये मोबाईल टॉवर्समधून होणारे विद्युतचुंबकीय उत्सर्जन, आधुनिक प्रकारच्या घरबांधणी पद्धतीमुळे घरट्यांच्या जागांची अनुपलब्धता, अन्नाची अनुपलब्धता, शहरांमधील वाढते प्रदूषण यांसारख्या अनेक कारणांमुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे.

२० मार्च हा दिवस दरवर्षी "जागतिक चिमणी" दिवस म्हणून पाळला जातो.


No comments: