Sunday, 2 September 2018

Bullockcart - Bailgadi लेख

बैलगाडी *


..vijay Jadhav


सहाय्यक व्यवस्थापक राजमाने केबिनमध्ये शिरले. त्यांनी बॅग टेबलवर काढली. कॅलक्यूलेटर, पेन या नेहमीच्या वस्तू काढून झाल्यावर एक कप्पा अगदी हलकेच उघडला. त्यातून बैलगाडी बाहेर काढली आणि टेबलच्या कोपऱ्यावर हलकेच ठेवून दिली. पेपरवेट, काही फाईल्स या वस्तू टेबलच्या एका बाजूला ठेवल्या. फक्त बैलगाडी टेबलच्या दुसऱ्या बाजूला. मध्यभागी संगणक. बराच वेळ ते तिच्याकडे पाहत राहिले. सहाय्यक विनोद सहीसाठी काही  कागद घेऊन आला. सही झाल्यावर त्याचे लक्ष बैलगाडीकडे गेले. "सर, तुम्ही आणलीत का ?" राजमानेंनी होकारार्थी उत्तर दिले. "मस्त आहे." म्हणून विनोद निघून गेला. काही वेळाने प्रशिक्षण देणारी सुनंदा आली. प्रशिक्षणाच्या पुढच्या वेळापत्रकाबद्दल बोलून झाले. आतापर्यंतच्या प्रशिक्षणात आलेल्या अडचणी मांडल्या. अडचणी मांडत असताना राजमानेंना फोन आला. ते फोनवर बोलत असताना सुनंदाचे लक्ष बैलगाडीकडे गेले. तिने  न राहवून ती हातातही घेतली. इकडून तिकडून पाहिली.  फोन संपताक्षणी राजमानेंना तिने उत्सुकतेने विचारले, "सर, तुम्ही आणलीत का?" "हो." राजमाने म्हणाले. पुढच्या दोन-तीन दिवसांत वार्ता षटकर्णी झाली.कार्यालयातील सर्व जण निमित्ते काढून राजमानेंच्या केबिन मधे येऊन गेले आणि बैलगाडी हातात धरून, वाकडी तिकडी करून पाहून गेले. तुमची आहे का, तुम्ही आणलीत का, कुठून आणलीत, कोणी दिली आणि मस्त आहे या वाक्यांची उजळणी दररोज होऊ लागली. राजमानेंनी कोणालाही "हो. मी घेतली एका नातेवाईकाकडून " या साधारण उत्तरापलीकडे नेले नाही. अधिक सांगण्यात त्यांना फारसा रस नव्हता. गाडीच्या कौतुकाने राजमाने आतून सुखावत होते पण त्यांच्या  मनाच्या एका बाजूचा समास प्रश्नांनी भरत होता. एक दिवस टाईम ऑफिसचे वागळे खूप दिवसांनी केबिनमधे आले. त्यांनीही बैलगाडीची चौकशी केली. बाकीच्या सगळ्यांना "मी आणली आहे" हे उत्तर पुरेसे होते. पण या उत्तराने वागळेंचे समाधान झाले नाही. बैलगाडी आणूनही खूप दिवस झाले होते. आता राजमानेंनी फार आढेवेढे न घेता सांगितले. ते म्हणाले, "माझी एक मेहुणी आहे. ती अशा प्रकारच्या लाकडी पॉलिश्ड पीसेसचा व्यवसाय करते. शो पीस म्हणून विकते. असे पीसेस लहान मुलांना खेळायलाही होतात. काही दिवसांपूर्वी तिच्याकडे आम्ही गेलेलो असताना भरपूर माल दिसला. पेन स्टँड, टेबल खुर्ची...खूप आर्टिकल्स होती.  प्रत्येक पीसची नोंदणी झालेली होती. सगळा माल खपणार होता. फक्त ही एक बैलगाडी कोणीही नोंदवलेली  नव्हती. आमच्या घरातल्या सगळ्यांना ती आवडली व पत्नीला विचारून मेहुणीला रीतसर किंमत देऊन आम्ही ती घेतली. अर्थात, मेहुणीच असल्याने आम्हाला थोडी सूटही मिळाली. आम्ही नसती विकत घेतली तर कदाचित् काही दिवसांनी ती कोणीतरी घेतली असती. पण ती आमच्या नशिबात होती. काही दिवस घरी होती. शो पीस म्हणून शोकेसमधे होती. नंतर नंतर असं वाटलं की, ऑफिसला नेली तर माझ्या टेबलची शोभा वाढेल व एखादी वस्तू तरी ठेवता येईल तिथे. म्हणून आणली.  सध्या मोबाईल ठेवतोय मी तिच्यात. एक मोबाईल फिट बसतो मागच्या भागात."    वागळेंचे समाधान झाले. "पीस मस्त आहे. साहेब, तुमची दृष्टी सौंदर्यवादी आहे, हे माहीत नव्हतं." असे म्हणून ते निघून गेले. राजमानेंनी सुखावून गाडीकडे पाहिले. दोन बैल आणि गाडी. सगळे पिवळे चकचकीत. चाकांवर व बैलांवर काळी नक्षी. ऑफिस सुटले.राजमाने गाडीत बसले. गाडी पुढे धावू लागली. मनातल्या समासात खूप गर्दी झालेली होती. त्यांना काही महिन्यांपूर्वीचा प्रसंग आठवला...    "कुटुंबासह आपण गावाबाहेर फिरायला गेलो होतो. दिवसभर सहल करून परतताना एका हॉटेलमध्ये आपण थांबलो. त्याच्या शेजारी असेच लाकडी शोपीस विकणारे लोक बसलेले होते.  घोडे, विहीर अशा बऱ्याच गोष्टी होत्या. चहा घेताना आपली, बायकोची व मुलांची काहीतरी चर्चा झाली. 'पीस मस्त आहेत, घ्यायचा का एखादा, किंमत' वगैरे बोलणे झाले. 'कोणीतरी शोकेसला हात लावते. मग ते तुटतात. नकोच घ्यायला' असेही बोलणे झाले. ते रस्त्यावरचे विकणारे कुटुंब त्यांचे ते पीसेस विकले जावेत म्हणून मनापासून प्रयत्न करीत होते. ओरडून लोकांना बोलवत होते. अनेक जण गाड्या थांबवून पाहून जात होते. काही जण विकतही घेत होते. कुटुंबातला एक मुलगा आपल्याकडे आशाळभूतपणे पाहत होता. एक पीस उंचावून दाखवत होता. हे सगळे पाहून आपण घरी आलो आणि नेहमीचेच दृष्य म्हणून विसरूनही गेलो. किती वर्षांचा मुलगा असेल तो? चौदा ?पंधरा? शाळेत जात असेल का ?नंतर मेहुणीकडे जायचा योग आला. तिथे आपण अशाच पीसेसबद्दल खूप बोललो. तिच्या त्या व्यवसायात रुची दाखवली. तिचे कौतुक केले. एवढेच नव्हे तर एक पीस घेऊनही आलो. घरात काही दिवस ठेवून ऑफिसमध्ये घेऊन आलो. त्याची चर्चा झाली. आपल्याला लॉटरी लागल्यासारखा प्रत्येकजण येऊन त्या बैलगाडीवर बोलून गेला. दोन्ही घटना खऱ्याच. वस्तूही तीच. विकणारे लोक वेगळे. रस्त्यावरच्या त्या गरीब कुटुंबाकडचा पीस आपण खरेदी केला नाही. मेहुणीकडचा मात्र घेतला. मेहुणीचे बस्तान त्या व्यवसायात केव्हाच बसलेले होते पण त्या कुटुंबाचे पोट कदाचित त्या एखाद्या विहिरीच्या विकल्या जाण्यावर होते...    माझ्या केबिनमध्ये येऊन बैलगाडीचे कौतुक करणाऱ्यांपैकी तरी किती जणांनी अशा रस्त्यावरच्या विक्रेत्यांकडून वस्तू घेतल्या आहेत आणि किती जण यापुढे घेणार आहेत? सतत मोबाईल, रिमोट, कीबोर्ड अशांची सवय झालेल्या बोटांना ती गाडी हाताळताना फारच निराळी वाटली असेल. विंडोज सेव्हन दाखवणाऱ्या संगणकाशेजारी बसवलेला तो ग्रामीण पीस चर्चेत आला, यात काहीच आश्चर्य नाही. आधुनिक कार्यालयात दिसली म्हणून कौतुक झाले. नाहीतर... राजमानेंची रात्र बेचैनीत गेली. त्यांनी ठरवले, आपण येत्या सुटीच्या दिवशी त्या ठिकाणी जायचे.   घरात मित्राकडे जाऊन येतो असे सांगून निघाले. त्या हॉटेलपाशी येऊन पोचले. मालकाला विचारले, "इथे काही महिन्यांपूर्वी खेळणी विकणारे लोक बसले होते ते कुठे गेले?" "केव्हाच गेले इथून ते.  कधी या गावाला, कधी त्या गावाला. भटकत असतात." "कुठे गेले असतील, काही कल्पना?" "छे, आम्ही कशाला विचारतोय त्यांना? महापालिकाही कधी कधी हुसकावून लावते त्यांना." " पुन्हा कधी येतील?" " काही सांगता येत नाही."
 राजमाने खट्टू झाले. ते त्या जागेवर गेले. ति थल्या मातीला त्यांनी हात लावला. घरातून निघताना खिशातलं पाकीट जरा रिकामं होईल, असं त्यांना वाटलं होतं.     ते तसंच जड राहिलं.

No comments: