Sunday 2 September 2018

चिऊताईसाठी दार उघडा __लेख

*चिऊताईसाठी दार उघडा...*



संकलन_ *पक्षी मित्र विजय जाधव* _WhatsApp 8698786854


_अगदी नकळत्या वयात आपल्याला चिऊ-काऊची ओळख होते. त्यातील काऊ अजूनही बऱ्यापैकी दिसत असला तरी; चिऊताई मात्र भुर्रकन उडून गेली. कुठे? कधी? का? माहिती नाही... शहरांतून चिमण्या गायब झाल्याचे वास्तव माणसाच्या लक्षात आले. छोट्या आकाराची, गब्दुल बांध्याची, आखूड शेपटीची ही चिमणी नेमकी असते कशी, आपल्यासाठी तिचे अस्तित्व का आवश्यक आहे आणि त्यासाठी आपण काय करायला हवे... अशा सर्व बाजूंनी दिलेली चिऊताईची सविस्तर माहिती._ 🐣
भारतीय जनजीवनाशी एकरूप झालेला एक सर्वज्ञात व सर्वप्रिय पक्षी म्हणजे चिमणी. साहजिकच भारतातील अनेक प्रांतीय भाषांमध्ये चिमणीला नाव लाभलेले आहे. हिंदीत गौरिया, गुजरातीत धकली, बंगालीत छोटी चराई, मणिपुरीत सेंदांग, मल्याळीत नारायण पक्षी, तमिळमध्ये ऊर कुरुवी; तर नेपाळमध्ये गौरा व बलुचिस्तानात गिंजिंइकी. मूलतः आशिया, युरोप व आफ्रिकेतील हा पक्षी आज जगभर विखुरलेला दिसतो. इवल्याशा चिऊताईने पृथ्वी पादाक्रांत केली आहे.
छोटा आकार, गब्दुल बांधा, आखूड शेपूट व साधासुधा मातकट रंग, नाजूक पाय; पण भक्कम कोनाकृती चोच ही चिमणीची ओळख. भारतात तर सर्वत्रच चिमणीचे वास्तव्य आहे. समुद्रसपाटीपासून ते हिमालयात दोन हजार मीटर उंचीपर्यंत चिमणी वावरते. शहरांत, नदीकाठी, अरण्यात, माळावर, डोंगरावर, वाळवंटी प्रदेशात, काटवनात... अशा विविध ठिकाणी चिमणीने आपले घर वसवलेले आहे; पण चिमणीला माणसाचा सहवास अधिक प्रिय असल्याचे दिसते. माणसावर प्रेम करणारे जर माणसाव्यतिरिक्त कोणी असेल; तर ती चिमणी! चिमणी सहसा थव्याने वावरते. नराचे डोके राखाडी आणि गळा व छाती काळी असते. डोळ्यात काजळ घातल्याचा भास होतो. चिऊताई मात्र वरून तपकिरी, डोळ्यांवर फिकट भुवया व खालून शुभ्र असते. नर व मादी सहज वेगळे ओळखू येतात.
खऱ्या चिमण्यांना शास्त्रीय भाषेत "ओल्ड वर्ल्ड स्पॅरोज' असे संबोधले जाते. शास्त्रज्ञ त्याचे चार प्रकारे वर्गीकरण करतात. 🕊1) ट्रू स्पॅरो किंवा खऱ्या चिमण्या (27 प्रकार), 🐦2) रॉक स्पॅरो (1 प्रकार), 🐥3) ट्री स्पॅरो - वृक्ष चटक (4 प्रकार) व 🐧4) स्नोफिंच (8 प्रकार). पूर्वी चिमण्यांची गटवारी बया किंवा सुगरण पक्ष्यांबरोबर केली जात असे. आज जनुकतज्ज्ञ चिमणीवर्गावर अभ्यास करत आहे. "न्यू वर्ल्ड स्पॅरोज' किंवा अमेरिकेतील चिमण्या वेगळ्या आहेत. भारीट, डनॉक आणि फिंच या पक्ष्यांचा समावेश या गटात केला जातो. थोडक्यात म्हणजे, खऱ्या चिमण्या भारतात राहतात. भारतीय चिमण्या असतात साध्या, फिक्या रंगसंगतीच्या; तर अमेरिकन चिमण्या असतात रंगेल, रंगीबेरंगी! सर्वांत लहान चेस्टनट स्पॅरो 11 सेंमी असते; तर सर्वांत मोठी पॅरट-बिल "शुकतुंड' चिमणी चक्क 18 सेंमी असते.
चिमणी हा स्वच्छ पक्षी आहे. पिसे साफ करायला तिला फार आवडते. सकाळी व संध्याकाळी मातीत अंघोळ करणे, हा चिमणीचा आवडता उद्योग आहे. बहुधा गरम मातीत लोळून अंगावरील कृमी-कीटक काढणे हा त्यामागचा उद्देश असावा. दुपारच्या उन्हात पाण्यात अंघोळ करून शरीर झटकून पिसांमधील तुषार इतस्ततः उडवताना चिमणी पाहायला मिळणे, हा पक्षीनिरीक्षणातील एक आनंददायी क्षण आहे. बर्फाळ प्रदेशातदेखील वितळलेल्या बर्फातून तयार झालेल्या डबक्यांमध्ये चिमण्या स्नान करतात. स्नान करणे हा त्यांचा सामूहिक कार्यक्रम असतो. कुठून धोका आहे का, याकडे लक्ष ठेवण्यासाठी काही चिमण्या यावेळी शिपाईगिरी करत असतात.
चिमण्यांचा आहार शाकाहारी व मांसाहारी आहे. धान्य, बिया, फुलांच्या कळ्या, मकरंद, परागकण; याबरोबरच कीटक व इतर किडुक मिडुकदेखील (कोळी, अळ्या इत्यादी) चिमण्या फस्त करतात. भर दुपारी आराम करण्यासाठी चिमण्या छोट्या काटेरी झुडपे निवडतात किंवा बोरीबाभळीत निवांत बसून डुलक्या घेतात. सकाळी शिकार करणारे पक्षी आणि रात्री निशाचर घुबडे यांच्या आहारात चिमण्या असतात; त्यामुळे सतत एकमेकींशी बोलत चिमण्या परस्परांच्या संपर्कात राहतात. त्यालाच आपण चिवचिवाट म्हणतो.
चिमण्यांचा प्रजननकाल वर्षभर असतो. त्यांना हा वसा बहुधा माणसांपासूनच मिळाला असावा. त्यांची घरटी माणसांच्या सान्निध्यात, त्याच्या घरात वळचणीला, भिंतीतील भगदाडात, कौलांखाली, छज्ज्याआड अशा ठिकाणी असतात. गवताच्या काड्या, कचरा, कागद, पिसे, दोर असे जिन्नस जमवून चिमण्या घरटे करतात. हे घरटे म्हणजे कलाकुसरीचा अभाव; अंडी कशीबशी सुरक्षित राहावीत म्हणून केलेला जणू पोरकट प्रयत्न. त्यांनी चोचीतून आणलेल्या बऱ्याच काड्या- इतर साहित्या घरातच पडते आणि कचरा होतो. पूर्वी माणसे असा कचरा साफ करून टाकत; पण हल्ली "टीपटॉप' संस्कृतीतील मॉडर्न मंडळी कचरा तर साफ करतातच; पण "पर्मनंट' उपाय म्हणून घरटेच काढून टाकतात. 🐤🐦🐧🐣🐥पुष्कळदा त्यांची अंडी खाली पडून फुटत; तर कधी नुकतीच जन्मलेली त्यांची पिले जमिनीवर आपटून मरून जात. मात्र, या घटनांचा चिमण्यांवर विपरीत परिणाम झालेला दिसत नसे. जीवन व मरण एकाच प्रवासाचे अविभाज्य घटक आहेत, हे तत्त्वज्ञान त्यांच्या अंगात भिनले आहे जणू! हिरवट- पांढऱ्या रंगाची दोन- पाच अंडी मी चिमणीच्या घरट्यात कितीतरी वेळा पाहिली आहेत. एकदा पंखांत बळ आले, पिले फारकाळ आईवडिलांबरोबर राहात नसत. ती गेल्यावर आईवडील पुढल्या बाळंतपणाची तयारी सुरू करत. चिऊताईच्या सुरेल आवाजाने घर जागे राही.
सतत प्रजननात गुंग असणाऱ्या चिमणीकडे जगातील विविध संस्कृतींनी आसक्तपमाचे प्रतीक म्हणून बघितले, यात नवल ते कसले? ग्रीसमध्ये चिमणीचे नाते, प्रेमाची देवता "ऍफ्रोडेसियाक' हिच्याबरोबर जोडलेले आहे. भारतीय संस्कृतीतदेखील बृहत्संहितेत स्त्रीगमन करणाऱ्या चिमण्यांचा उल्लेख आढळतो. म्हणूनच छंदीफंदी लोकांना इंग्रजीत "स्पॅरो' म्हणतात. "पायरट्स ऑफ कॅरिबियन' या सध्याच्या चित्रपटशृंखलेत जॅक स्पॅरो कसा वागतो, यावरून आपल्याला याची प्रचिती येईल. भारतातील वाङ्मयात यापेक्षा वेगळे इतर प्रकारचे उल्लेखदेखील आढळतात. ऋग्वेदात ऋषी कुत्स आङिरस यांच्या लिखाणात लांडग्याने जखमी केलेल्या चिमणीला (वर्तिका) बरे केल्याचा उल्लेख आहे. महाभारतात शांतिपर्व, आपद्धर्मपर्वात 139व्या अध्यायात एका विद्वान चिमणीची - पूजनीची गोष्ट राजा ब्रह्मदत्ताच्या संदर्भात सांगितली आहे. पूजनी ही चिमणी सर्व प्राण्यांची भाषा जाणत असते. ती सर्वज्ञानी आणि तत्त्वपरिचित असते. विश्वप्रकाश या ग्रंथात चिमणीला कामी, कामाचारी, कामुक अशी नावे असल्याची नोंद के. एन. दवे यांनी केली आहे. "गृहकुलिंक' व "ग्रामचटक' याही नावांची नोंद दवे करतात. केशवकृत कल्पद्रुकोशात चिमणीला "स्वल्पसंचर', "कणभक्षक' व "कणप्रिय' अशी सुयोग्य नावे दिलेली आहेत. 🌹1660 मध्ये प्रकाशित झालेल्या या ग्रंथात चिमणीला "गृहकर्तृत्वक्षम' असेही एक नाव दिसते. यावरून पुरातन काळापासून माणूस चिमणीचे किती बारकाईने व आस्थेने निरीक्षण करत असावा, याचे दर्शन घडते.

आजीआजोबा पूर्वापार आपल्या नातवंडांना चिऊकाऊच्या गोष्टी सांगत आले आहेत. बाळाला जेवू घालताना, "हा घास चिऊचा', "हा घास काऊचा' असे म्हणणारे आजीआजोबा पुढील काळात राहतील का, असा जिवाचा थरकाप करणारा प्रश्‍न मनी येतो; कारण बदलत्या कुटुंबपद्धतीत आजीआजोबाही फारसे दिसत नाहीत आणि आधुनिक शहरांमधून चिमण्यांची संख्याही प्रचंड प्रमाणात घटली आहे. निसर्गाचा अविभाज्य घटक असणारा माणूस मोठा होत असताना बालपणी त्याने ऐकलेल्या "काऊ-चिऊ'च्या गोष्टी त्याची नाळ नकळत निसर्गाशी जोडतात.

इजिप्तमधील प्राचीन शीलालेखांवरील छोट्या चित्रांत चिमणी दिसते. या भाषेत चिमणीच्या सांकेतिक चित्राचा अर्थ छोटा, संकुचित व वाईट अशा तीन प्रकारे घेतलेला असल्याचे आढळले आहे. भारतातदेखील चिमणीला "छोटा' या अर्थाने "चटक' किंवा "चटकिका' अशी नावे संस्कृतमध्ये आहेत.
मराठी कवितेत तर चिमणी आहेच. कुसुमाग्रजांच्या कवितेतून चिमणी, "उठा उठा चिऊताई, सारीकडे उजाडले, डोळे तरी मिटलेले, अजूनही-' अशी भेटते.

आपल्याकडच्या काय किंवा कुठल्याही म्हणींना खूप गहन व मार्मिक अर्थ असतो. एक म्हण चिऊताईच्या बाबतीत वेगळ्या अर्थाने लागू होते. वाटेल ते किंवा अनुचित- प्रसंगाला साजेसे न बोलणाऱ्या माणसाला, "तुझ्या जिभेला काही हाड...' असे म्हटले जाते. आपण तर ऐकतो चिऊताई मंजुळ आवाजात बोलते, चिवचिवाटही सुरेल करते; म्हणजे तिच्या जिभेला हाड आहे, असे म्हणावे का? शास्त्रीय निरीक्षणातून असे सिद्ध झाले आहे, की चिमणीच्या जिभेला खरोखरच एक इवलेसे हाड असते. म्हणूनच चोचीने बिया व धान्य खाताना, कठीण चोच व ताठर जिभेच्या साह्याने चिमणीकुलीन पक्षी टरफले सोलून थुंकून टाकतात व आतील गर तेवढा गट्टम करतात. आहे ना मौज?

अशा चिमणीवर प्रेम करण्यासाठी हळवी, प्रेमळ व सुसंस्कृत माणसे हवीत; पण चिमण्या मारून खाणारी माणसेदेखील मी पाहिली आहेत... अगदी आपल्या देशात! चिमण्यांवर हल्ला करून त्यांना नामशेष करण्याची क्रूर मोहीम आपल्या शेजारच्या देशात काही वर्षांपूर्वी पुकारली होती, त्याचे स्मरण या निमित्ताने होते. चीनमध्ये माओ झेडॉंग यांनी 1958-62 एक अतिशय क्रूर पद्धत राबविली. याला "ग्रेट स्पॅरो कॅम्पेन' या नावाने जगात ओळखतात. पिकांना व शेतकऱ्यांना उपद्रव करणाऱ्या प्राण्यांचा बंदोबस्त कायमचा करून टाकायचा म्हणून कम्युनिस्ट राजवटीने लोकांना एक फर्मान काढले. उंदिर, माशा, डास व चिमण्या यांचा निःपात करण्याची आज्ञा माओ राजवटीने दिली. या "चांडाळचौकडी'त चिमण्या का बरे आल्या? तर माणसाला उपयुक्त धान्य त्या वेचून खातात म्हणून त्या म्हणे माणसाच्या शत्रू आहेत. माणसाचा घास चोरणारी म्हणून चिमणी शत्रू नंबर एक. गावोगावी, खेडोपाडी लोक फटाके वाजवून चिमण्यांना हाकलू लागले. डबे बडवून चिमण्यांना पळवू लागले. बसली चिमणी की हाकल. बिचाऱ्या चिमण्या हजारोंच्या संख्येने दमून-भागून जमिनीवर आदळू लागल्या. थकून गतप्राण होऊ लागल्या. लोकांना आयते खाद्यदेखील मिळू लागले. फुकटचा मांसाहार मिळाल्याने लोक आनंदले. मग चिमण्यांची घरटी शोधून अंडी-पिले खाण्यात आली. या कामगिरीसाठी शाळा व सरकारी कार्यालयांतून लोकांचे कौतुक होऊ लागले. जास्त चिमण्या मारणाऱ्यांची छायाचित्रे वर्तमानपत्रांत झळकू लागली... आणि एक दिवस जणू सगळ्या चिमण्या संपल्या. मोहीम फत्ते झाली; पण त्याचा विपरीत परिणाम लगेच दिसू लागला. पिकांवरील कीड व कीटकांवर फार मोठ्या प्रमाणात नियंत्रण ठेवणाऱ्या चिमण्याच नसल्याने कीड इतकी फोफावली, की "न भूतो न भविष्यति' अशा प्रकारचा दुष्काळ चीनवर पसरला. या काळ्याकुट्ट छायेत तीस दशलक्ष माणसे मृत्युमुखी पडली. "ग्रेट स्पॅरो कॅम्पेन'ची परिणती "ग्रेट चायनीज फॅमिन'मध्ये झाली. देश होरपळून गेला. जगाने या भयंकर क्रौर्यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अमेरिकेत "रेड स्पॅरो ग्रुप'ने गाणी रेकॉर्ड केली, दूरचित्रवाणी- रेडिओवर कार्यक्रम झाले. पुस्तके निघाली. माणसाने अविचाराने व निर्घृणपणे चिमण्यांची कत्तल केली याचा सूड जणू निसर्गाने माणसावर घेतला. त्यानंतर माओ सरकारने चिमणीचे नाव त्या "चांडाळचौकडी'तून काढले व त्याऐवजी त्यात ढेकूण व झुरळांचा समावेश केला. निरागस, साध्यासुध्या, कोणाच्या अध्यातमध्यात नसलेल्या चिमण्यांवर मात्र संक्रांत आली, त्यांचा नायनाट झाला आणि ते लोकांना त्रासदायक ठरले.

आज पन्नास वर्षांनंतर चिमण्यांच्या अस्तित्वाला पुन्हा धोका निर्माण झाला आहे. महानगरांमधून चिमण्या गायब होत आहेत. पूर्वीच्या जुन्या घरांत- वाड्यांमध्ये कौलांखाली, वळचणीत, भिंतींमधील निखळलेल्या विटांच्या भगदाडात; चिमण्यांना घरट्यासाठी जागा सापडत असत. आजच्या अत्याधुनिक इमारतींमध्ये त्या कुठे घरटे करणार? फसाडच्या काचांवर त्या फक्त धडकणार आणि मरणार! परस गेले आणि टेरेसच्या कुंडी-बगिच्यातील झाडांवर कीटकनाशके फवारली जाऊ लागली. चिमण्यांनी कीटक मिळेनासे झाले. अंगणात व गच्चीवर एकेकाळी, वाळवणे, पाखडणे असे प्रकार नियमित होत. आज "पॅक्‍ड' धान्य मिळते. चिमण्या धान्य कोठून मिळविणार? पहाटे उठून कामाला जाणारे नवरा-बायको, खोल्या व घरे स्वच्छ राहावीत म्हणून खिडक्‍या-दारे बंद करून कामाला जातात. त्यांच्या "कॉम्पॅक्‍ट फॅमिली'ने आजी-आजोबांची कधीच हकालपट्टी केलेली आहे. माणुसकीवर प्रेम करणारी चिमणीदेखील अशा घरांपासून दुरावणार नाही का?

शहरांची शांतता भंग पावली आहे. ट्रॅफिकचा आवाज पहाटे फक्त दोन तास बंद असतो. सतत गोंगाट होत असल्याने अनेक पक्ष्यांची गाणी आणि आवाजदेखील बदलत आहेत. त्यामुळे विणीवर दुष्परिणाम होतो आहे. पक्ष्यांना जोडीदार ओळखू येत नाहीत, अशी धक्कादायक शास्त्रीय माहिती संशोधनातून पुढे येत आहे. पक्ष्यांच्या गाण्यांऐवजी वाहनांचे कर्कश्‍श हॉर्न कानांवर आदळतात. लाऊडस्पीकरच्या भिंती गरजतात, कानांचे पडदे फाटतात; पण माणूस निगरगट्टपणे वागणूक तशीच ठेवतो. हतबल चिमण्या शहरे सोडण्याशिवाय करू तरी काय शकतात?

आज महानगरांमध्ये रात्री कधीच काळाकुट्ट अंधार नसतो. मध्यरात्रीदेखील प्रकाश असतो. त्यामुळे आपली व पशुपक्ष्यांची नैसर्गिक लय बिघडत आहे. त्याचा परिणाम म्हणजे आजार. अशा कृत्रिम अधिवासाशी सामावून घेण्याची क्षमता अनेक पक्ष्यांकडे व प्राण्यांकडे नसते. म्हणून साळुंक्‍या, पोपट, घुबडे असे अनेक पक्षी शहरांतून फार मोठ्या प्रमाणात कमी होत आहेत. तर मनुष्यनिर्मित कचऱ्यावर उपजीविका करणारे घार व कावळा; तसेच, इमारतींवर राहणारी कबुतरे वाढत आहेत. शहरी पक्ष्यांची "कम्युनिटी' बदलली आहे; पण यात चिमण्यांचा हकनाक बळी जात आहे.

खेड्यांमध्ये अजूनतरी भरपूर चिमण्या दिसतात. जिथे माणसाच्या जीवनपद्धतीत आमूलाग्र बदल झालेला नाही, तिथे चिमण्या टिकून आहेत. शहरांमध्येदेखील सीमेच्या भागात चिमण्यांचा वावर दिसतो. आपण पक्ष्यांसाठी योग्य अन्न (राळं, धान्य, फळे कापून ठेवणे), पाणी व घरटी करण्यासाठी जागा आणि कृत्रिम घरटी निर्माण केली, तर चिमण्या व इतर पक्षी तग धरू शकतील. कीटकनाशकांचा वापर बंद करून त्यांना होणारी विषबाधा टाळू शकलो, तर कीटकांची उपलब्धता होऊ शकेल व चिमण्या त्यांचे नियंत्रण करतील. फुलझाडे व भारतीय वृक्ष लावले, तर पक्ष्यांना योग्य अधिवास पुन्हा प्राप्त होईल. आपल्यालाही पक्ष्यांची गाणी ऐकू येतील. त्यांचे बागडणे बघता येईल. आल्हाददायक वातावरण निर्माण झाले, तर वेगाने ढासळणारे निसर्गाचे संतुलन थोडेसे सावरेल. निसर्गाच्या नाजूक संतुलनाच्या व स्वास्थ्याच्या चिमण्या निदर्शक आहेत. माणुसकीच्या मोजमापाचे त्या थर्मामीटर आहेत. या थर्मामीटरचा पारा किती वाढू द्यायचा हे आपण- तुम्ही-आम्हीच ठरवायचे आहे. चिमण्या बिचाऱ्या हतबल, असहाय्य आहेत. मोबाईलचे प्रक्षेपक टॉवर व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांना दोष देऊन मोकळे होण्यापेक्षा माणुसकीने वागून राहणीमानात जबाबदारीपूर्वक बदल करणे हीच खरी निसर्गाप्रती कृतज्ञता ठरेल. मग निसर्ग चिऊताईच्या गळ्याने गाऊ लागेल. चला, चिऊताईसाठी मनाची तरी कवाडे उघडू या!


No comments: